मुंबई : राज्यात महापालिका, नगरपालिका यांच्या अर्थसाह्याने ‘इको पार्क’ तयार करण्याची योजना वनविकास महामंडळामार्फत राबविण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. वनविकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा खासगी भागीदारीतून विकास करण्यासाठी नवीन संस्थेची निवड करावी. मुख्य सचिव यांनी याबाबत आढावा बैठक घ्यावी. या उद्यानातील विकासकामांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.एमआयडीसी, आदिवासी विकास तसेच खनिकर्म इत्यादी विविध शासकीय विभागांकडे असलेल्या रिकाम्या जागांवर वनविकास महामंडळामार्फत हरित पट्टे निर्माण करणे, शेती महामंडळाच्या मालकीची वापरात नसलेली जमीन वनविकास महामंडळाला विविध उद्योगांसाठी तसेच निसर्ग पर्यटनासाठी हस्तांतरित करणे, वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, कन्हारगाव अभयारण्यामध्ये जाणाऱ्या क्षेत्राच्या बदल्यात वनविकास महामंडळाला २५ हजार हेक्टर उत्पादनक्षम वन जमीन देणे, वनमजुरांना सेवेत कायम करणे, वनविभागाला परत केलेल्या जमिनीचे मूल्य म्हणून शासनाकडून २२८ कोटी इतकी प्रलंबित रक्कम घेणे अशा अनेक बाबींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर मुख्य सचिव यांनी वनविभागाचे प्रधान सचिव तसेच संबंधित विभाग यांच्या समवेत बैठक घ्यावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन उपस्थित होते.
शहरांमध्ये इको पार्क उभारणार; नागपूर प्राणीसंग्रहालयास भरीव मदत; उद्धव ठाकरे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:55 AM