मेघना ढोके,
नाशिक - ‘प्रश्न फक्त आमच्या पैशाचा नाही, तर नेपाळी लोकांच्या भारतावरच्या विश्वासाचाही आहे !’ असं नेपाळच्या न्यूज स्पॉटलाईट मॅगझिनचे संपादक केशब पौडेल सांगत असतात तेव्हा त्यांच्या आवाजात आर्थिक संकटाचं मोठं भय जाणवतं, काही दिवसांपूर्वी धरणीकंप झाला होता तेव्हा जाणवत होतं तसंच!प्रश्न आहे नेपाळी माणसांच्या हाती असलेल्या भारतीय चलनाचा. नेपाळमध्ये एनएनसी अर्थात नेपाळी राष्ट्रीय चलन आणि आयएनसी अर्थात भारतीय राष्ट्रीय चलन अशा दोन्ही देशांच्या नोटांद्वारे व्यवहार होतात. नेपाळ-भारत सीमा खुली असल्यानं व्यापारउदीमसह पर्यटक, रुग्णालय आणि रोजंदारीसाठी भारतात येणाऱ्या नेपाळी माणसांची संख्या मोठी आहे. नेपाळ राष्ट्र बॅँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांत एकूण ३.३६ कोटी रुपये आहेत. मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी असेल; कारण बॅँकाकडे नोंद न होता होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची, घरात साठवल्या जाणाऱ्या नोटांची संख्या मोठी आहे.नेपाळी माणूस घरात मोठ्या रकमांच्या ज्या नोटा बचत म्हणून ठेवतो त्या भारतीय चलनातल्या असतात. त्यामुळे आजच्या घडीला बहुसंख्य नेपाळी माणसं हवालदिल झालेली आहेत. बचतीचं काय होणार, असा मोठा प्रश्न आहे. आणि या चलनाचं नियमन करणारी राष्टीय बँकही या प्रश्नाचं काही ठोस उत्तर देऊ शकत नाही. भारतीय सैन्याच्या गुरखा बटालियनमधून निवृत्त झालेले साठ हजार गुरखे नेपाळमध्ये आहेत. ते त्यांचं निवृत्तिवेतन भारतीय रुपयांत स्वीकारतात. त्यात भारतात शिकायला येणारे विद्यार्थीही बहुसंख्य आहेत. भारतात रोजीरोटी करून नेपाळमध्ये घरी जो पैसा पाठवला जातो तो भारतीय चलनातच पोहोचतो. नेपाळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी ८० टक्के व्यापार हा भारताबरोबर होतो. पैसा भारतीय चलनात स्वीकारला, वापरला जातो. त्यामुळे आपल्या पैशाचं काय होणार या विचारानं जनता आता नेपाळ सरकारला आणि राष्ट्र बॅँकेला धारेवर धरत आहे.>उपाय काय?देशांतर्गत दबाव वाढल्यानंच नेपाळ बॅँक आणि खुद्द पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी करून या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आता रिझर्व्ह बॅँकेच्या वतीने एक कृती दल नियुक्त करण्यात आलं असून, नेपाळी जनतेच्या नोटा कशा बदलता येतील याकामी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.>नोटा बदलणार, पण...एका देशाचं चलन असं दुसऱ्या देशात बदलून देणं, त्यासाठीच्या आंतराष्ट्रीय वाटाघाटी आणि तोडगा हादेखील या काळात एक नवीन पायंडा असेल अशी शक्यता आहे. नेपाळी जनतेला आश्वस्त करण्यात आलं आहे की, तुमच्या नोटा बदलून देऊ, पण ते कसं यासाठीची माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाही.>आमच्यासाठी भारतीय नोटा म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि भविष्याची तरतूद आहे. त्याच रद्द झाल्यानं हतबलता आहेच, पण आता त्याच्यासमोर आयुष्यभराच्या पुंजीचा प्रश्न आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आहे, भारतावरच्या विश्वासाचा. - केशब पौडेल, संपादक, न्यूज स्पॉटलाईट मॅगझिन, काठमांडू