श्रीरामपूर : देश व राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार दिवाळखोरीत गेले आहे. रिकामी तिजोरी भरण्याच्या उद्देशानेच आगाऊ आयकर भरणे, जनधनसारख्या योजनांमधून लोकांच्या खिशातील पैसा काढण्याचे काम सुरू आहे. देशोदेशी फिरून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विदेशी थेट गुंतवणूक आणण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात यश न आल्याने देश व राज्यात आर्थिक आणीबाणी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.एका स्मृतीग्रंथाच्या प्रकाशननिमित्त ते येथे आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्य सरकारला ३५ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. डिसेंबरपासून राज्य दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ३ महिन्यांपूर्वी दिलेला आर्थिक आणीबाणीचा इशारा आता खरा होताना दिसत आहे.दुष्काळाबाबत पूर्वीच्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना व आताच्या भाजपावाल्यांना काही देणेघेणे नाही. ओवेसींची मुस्लिमांना सुरक्षितता देण्याची मुस्लीम लीगची जुनीच भूमिका असून ती हिंदुत्ववाद्यांनाच तारक ठरेल, असे आंबेडकर म्हणाले. आदिवासी, नक्षलवादी, आंबेडकरवादी, ओबीसींचे संघटन एखाद्या घटनेत सहभागी दिसल्यास त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करून त्यांची चौकशी होते. त्याच धर्तीवर आता दाभोलकर-पानसरे हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन झाले पाहिजे. राज्याने न केल्यास कर्नाटक पोलीस येऊन ते करतील. ही नामुष्की ओढवू नये अशी दक्षता महाराष्ट्र पोलिसांनी घ्यावी, असा सल्लाही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
देशात आर्थिक आणीबाणी
By admin | Published: October 05, 2015 3:35 AM