मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात तब्बल पाचवेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या पवित्र्यात असून, न्यायालयातून अजामीनपात्र वाॅरंट मिळवणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.ईडीने २५ जूनपासून आतापर्यंत देशमुख यांना पाचवेळा तर मुलगा ऋषिकेश यांना दोनवेळा व पत्नी आरती यांना एकदा चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. मात्र ते एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ईडीने त्यांना व ऋषिकेश यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याबाबत सूचना केली होती. मात्र दोघांनीही तिकडे पाठ फिरवत वकिलांमार्फत पत्र दिले.देशमुख यांच्यावर कारवाई करण्यास न्यायालयाची आडकाठी नसल्याने ईडीने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्याची पहिली कार्यवाही म्हणून त्यांच्याविरुद्ध न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे ठरवले आहे. त्याबाबत कोर्टाकडे अर्ज करून मागणी करण्यात येणार असल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले.
या प्रकरणात ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. तर देशमुख यांच्या मुंबई, नवी मुंबई, नागपूर येथील मालमत्तेवर छापे टाकले आहेत. वरळीतील फ्लॅट व उरण येथील भूखंडही जप्त केला आहे.