पुणे : नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे ईडी आणि आयबी नावाचे दोन बलाढ्य कार्यकर्ते आहेत. ते इतर पक्षातील नेत्यांना भेटून त्यांना समजावून सांगतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कुठल्या पक्षात गेलं पाहिजे, नाही गेलं तर काय होईल या सर्व गोष्टींची त्या नेत्यांना कल्पना देऊन त्यांच्यासाठी कुठला पक्ष सोयीस्कर आहेत हे सांगतात. सध्या भाजप मध्ये सुरू असलेली मेगा भरती ही या बलाढ्य कार्यकर्त्यांमुळेच सुरू आहे. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
शेट्टी म्हणाले,ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत किंवा ज्या नेत्यांना विविध आरोपांखाली चौकशीची भीती आहेत तेच लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर ठाम भूमिका घेत आरोप असलेल्यांची चौकशी पक्षप्रवेशानंतर देखील निःपक्षपातीपणे केली जाईल.
आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढत आहेत. बांधकाम मजुरांचे मृत्यू, पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.