मुंबई
शिवसेनेचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मोठा दणका दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबागमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीनं आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. अलिबागमधील एकूण ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीनं जप्त केला आहे. याचा संबंध संजय राऊत यांच्याशी आहे.
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.