पंढरपूर : ईडी, सीबीआय, कारखान्यावरील व बँकेतील कर्जाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे नेते भाजप, शिवसेनेत सामील होत आहेत, परंतु जाणारे नेते राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्यावर प्रेम व्यक्त करीत आहेत. एकाही नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली नाही. यावरून असे स्पष्ट होते की केवळ भीतीमुळे येथे पक्षांतर होत असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात व राज्यात मंदीची लाट आहे. अनेक कंपन्या बंद पडत आहे. कामगारांवर उपासमारीची पाळी येत आहे. राज्यात इकीकडे पूरपरिस्थिती तर दुसरीकडे दुष्काळ आहे. या प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचे दिसून येत नाही. अजून ही शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. अशा अनेक समस्या भेडसावत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
ते बाळासाहेबांचे संस्कार...मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज यांची चौकशी झाली तरी त्यांना काही होणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले होते. संकटकालीन परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून दोन बंधू एकमेकांना साथ देतात, हे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवण्याचे स्पष्ट होते.