- डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र सदन बांधकाम आणि खारघर येथील हेक्स वर्ल्ड प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) न्यायालयात ५३ जणांविरुद्ध ११ हजारांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या ५३ जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ तसेच राज्यसभा सदस्य व काकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे संजय काकडे, असिफ बलवा आणि डी. बी. रियल्टी ग्रुपचे विनोद गोयंका यांचा समावेश आहे. या प्रकरणात ईडीने १३१.८६ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. छगन, पंकज व समीर भुजबळांनी ८७० कोटी रुपयांची मालमत्ता जमविली असून या वरील १३१.८६ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा बाजारभाव ३४० कोटी रुपये आहे. ११ हजारांपेक्षा जास्त पानांचा आरोपपत्राचा संच, आरोपपत्र असलेल्या काही सीडीज् न्यायालयास सादर करण्यात आल्या. ५३ आरोपींवर हवाला प्रतिबंधक कायद्याचे कलम तीन आणि चार अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.आम्ही अजूनही चौकशी करीत आहोत आणि पुरवणी आरोपपत्रही लवकरच सादर करणार आहोत. या पुरवणी आरोपपत्रात भुजबळांनी (विशेषत: सिंगापूर आणि इंडोनेशियात) केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा तपशील असेल, असे सांगून ईडी अधिकारी म्हणाले की, छगन भुजबळ कट रचणारे व पंकज व समीर त्यांना साह्य करणारे असून, भुजबळांकडून या दोघांनी सूचना घेतल्या होत्या. त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक याने छगन भुजबळांविरुद्ध केलेली निवेदने हे मुख्य पुरावे आहेत. भुजबळांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये पैसे ओतण्यासाठी कोलकाता येथील आर्थिक कंपन्यांना रोख पैसे देऊन त्यांच्याकडून धनादेश (चेक्स) घेण्याचे काम मी केल्याचे नाईक याने मान्य केले आहे. अमित बलराज याने छगन भुजबळांच्या उपस्थितीत एमईटीच्या वांद्रे कार्यालयात कोट्यवधी रुपये कसे आणले गेले याचा सगळा तपशील दिला. याशिवाय व्यवसाय न करणाऱ्या व वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्या जाणाऱ्या कंपन्यांचे (शेल कंपन्या) आयकराचे अहवाल व रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्च्या (भुजबळांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे तपशील दिले) अहवालांत संचालक कसे बदलले गेले आणि भागभांडवल कसे वाढविले गेले, तसेच बँक खात्यांचा तपशील दिला गेला, यातून कंत्राटदारांनी दिलेल्या लाचेचा (किकबॅक्स) तपशील मिळतो. आरोपपत्रात हेच पुरावे आहेत, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.काकडे, गोयंका आणि बलवा यांना का आरोपी करण्यात आले आणि त्यांच्यावर आरोपपत्र का ठेवण्यात आले, असे विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे येथील भूखंडावर भुजबळांच्या कंपन्यांतर्फे करण्यात येत असलेल्या बांधकामात त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती.पुरवणीही येणारकलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राचा ईडी अभ्यास करीत आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे पुरवणी आरोपपत्र दाखल करेल. याबाबत ईडी सिंगापूर आणि इंडोनेशियाला विनंतीपत्र लिहून भुजबळांनी तेथे केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती मागविणार आहे. भुजबळांची आणखी मालमत्ता जप्त केली जाईल.१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर : केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून आणि कुठलीही अधिकृत रजिस्ट्री न करता भुजबळांनी त्यांच्या कंपन्यांसाठी प्रचंड पैसा मिळविला. त्यात डी.बी. रियल्टी ५ कोटी, बलवा ग्रुप आॅफ कंपनीतर्फे २० कोटी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे १० कोटी रुपये यांचा समावेश आहे.
ईडीचेही आरोपपत्र
By admin | Published: March 31, 2016 2:01 AM