ED Action: सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रातील मुंबई, नागपूरमधील सुमारे १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ईडीच्या या धडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने मोठी कारवाई केली आहे. पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील १५ ठिकाणी शोध मोहीम केली. यादरम्यान ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर
ईडीने नागपूरमध्ये एकूण १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा तपास सुरू आहे. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंकज मेहाडिया नागपुरातील ठग म्हणून ओळखला जातो. व्याजाचे आमिष दाखवून व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप मेहाडियावर आहे. मेहाडिया यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०२१ मध्ये यांना अटकही करण्यात आली होती. यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"