लोकमत न्यूज नेटवर्क, विटा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या वॉशिंग पावडरने भ्रष्टाचारीसुध्दा स्वच्छ होऊ शकतात. सक्तवसुली संचालनालय (ED) ईडी, सी.बी.आय. तसेच आय.टी. हे भ्रष्टाचाराच्या विरोधातील शस्त्र नसून ते अन्य दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मोदी-शहा यांच्याजवळ आणणारे अस्त्र आहे, अशी सडकून टीका जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या व राज्यसभेच्या खासदार कॉ. वृंदा करात यांनी केली.
विटा (जि. सांगली) येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर कॉ. करात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून स्वत:चा पक्ष वाढविण्याचे काम सुरू केले आहे. मोदी व शहा यांच्याकडे असलेल्या वॉशिंग पावडरने भ्रष्ट लोकांना शुध्द करून पक्षात पवित्र केले जात आहे. केवळ मोदी सरकार बळकट करण्यासाठी व विरोधकांना विस्कटण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.
गेल्या काळात ईडीने ३ हजार ७०० जणांवर गुन्हे दाखल केले. मात्र त्यातून केवळ २३ जण दोषी आढळले. तुम्ही जर विरोधात असाल तर भ्रष्टाचारी आणि भाजपात आला तर स्वच्छ पवित्र असाल असे यातून दाखवायचे आहे. दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या महागाई नसल्याचे सांगत आहे, हे सांगताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती, असेही कॉ. वृंदा करात म्हणाल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जर भाजपला तिरंगाबाबत प्रेम निर्माण झाले असेल तर ते चांगलेच आहे. परंतु, संविधानाला धाब्यावर बसवून जर तुम्ही केवळ दिखावा करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविणार असाल तर देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा देत हर घर तिरंगा सोबतच हर घर संविधान घेऊन ही मोदी सरकारने जावे, असेही कॉ. वृंदा करात म्हणाल्या.