पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांच्या रायगडमधील १ हजार कोटीच्या बेनामी मालमत्तेबाबत माहिती समोर येताच, दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रवीण राऊत यांच्या दोन जवळच्या व्यक्तींच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.
गुरुवारी सकाळी दिल्ली ईडीचे २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडून ठाणे, रायगडमध्ये छापे टाकण्यात आले. राऊत त्यांच्या २ निकटवर्तीयांच्या संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांच्या मार्फत त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी १ हजार कोटीची बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. पीएसीएल नावाच्या कंपनीने २०१५ मध्ये भारतात पॉन्झी स्कीम राबवून ५ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून कंपनी बंद झाली. सेबीने कंपनीवर कारवाई केल्यानंतर या ग्रुपकडून आलेल्या १ हजार कोटीच्या काळा पैशातून रायगडमध्ये जागा घेतली. प्रवीण राऊतच्या चौकशीतून ईडीला या बेनामी मालमत्तेबाबत माहिती मिळाली. याच जागेसंदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामागे संजय राऊत यांचाही काही सहभाग आहे का? याच्या चौकशीसाठी ईडीचे अधिकारी तपास करीत आहेत.
१,०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपात मनी लाॅड्रिंगचा दाखल गुह्यांत ईडीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राऊत यांच्यावर अटकेची कारवाई केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.