जळगाव : अनेक दिवसांपासून ईडी आणि सीडी बाबत चर्चा सुरू आहेत, हा विषय आता जुना झाला आहे. मात्र, आता ईडी लागली असून त्यांनी आता सीडी दाखवावी असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे(NCP Eknath Khadse) यांना दिले आहे.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ईडी आणि सीडी वरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची इडीची चौकशी सुरु असून, सीडी केव्हा लागेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, सीडी बाबत काही जणांकडून अभ्यास व तपासणी सुरू आहे. ती तपासणी व अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहिररित्या सीडी दाखवावी असे आव्हान गिरीश महाजन(BJP Girish Mahajan) यांनी दिले आहे.
मंदिरे उघडली नाही तर आम्ही उघडू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे आता अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये देखील मंदिर उघडली गेली आहेत.मात्र राज्य शासनाकडून अजूनही मंदिरे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने सोमवारी भाजप कडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही ती मंदिरे उघडू असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.