मुंबई : राजकीय सत्तासंघर्ष एकीकडे तीव्र होत असतानाच सोमवारी दुपारी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. ईडीने राऊत यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपल्याला अलिबागला जायचे असून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आपण पुढील वेळ मागून घेणार असल्याचे राऊत यांनी माध्यमांना सांगितले. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान यांच्याविरोधात ही तक्रार म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली होती. या प्रकरणी ईडीने चौकशीची सूत्रे हाती घेतली आणि ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी एचडीआयएल कंपनीने १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यात वळविल्याचे दिसून आले. प्रवीण राऊत यांनी हे पैसे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि काही व्यावसायिकांच्या खात्यामध्ये फिरवल्याचा ठपका ईडीने ठेवला. याच पैशांतील ८३ लाख रुपयांची रक्कम प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाली. मात्र ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आणि याच पैशांचा वापर करून वर्षा राऊत यांनी त्यांचा दादर येथील फ्लॅट खरेदी केल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. तसेच, याच कालावधीमध्ये वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटेकर यांच्या नावे किहिम येथे आठ भूखंडांचीही खरेदी झाली. या भूखंड खरेदीतील अनेक व्यवहार हे रोखीने झाल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहिम येथील ८ भूखंड यांची एप्रिल महिन्यात तात्पुरती जप्ती केली आहे. तर प्रवीण राऊत यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे. संजय राऊत ट्विटरवर म्हणतात... -- मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. - मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या मला अटक करा (विशेष म्हणजे राऊत यांनी या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.)
उपलब्ध माहितीनुसार गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. पत्राचाळीतील ६७२ घरांच्या पुनर्विकासाचे हे काम होते.
१,०३९ कोटी रुपयांचा घोटाळा... -येथील लोकांचे पुनर्विकासाचे काम केल्यानंतर यात अतिरिक्त बांधकाम करत ते बिल्डरने म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, बिल्डरने हे बांधकाम न करता यातील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) हा नऊ अन्य बिल्डरांना विकला आणि त्यापोटी त्याला ९०१ कोटी ७९ लाख रुपये मिळाले. तसेच, तेथील जागेच्या विक्रीसाठी ग्राहकांकडून बिल्डरने आगाऊ रक्कमही गोळा केली होती. ही रक्कम १३८ कोटी रुपये इतकी होती. अशा प्रकारे यामध्ये एकूण १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.