मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बाेलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंथिया दाद्रस या नावाच्या व्यक्तीचे हे कॅलिफोर्नियातील फेयरमॉन्ट बँकचे कार्ड असून, त्यावर सरनाईक यांचा पत्ता असल्याचे समजते. याबाबत ईडीने संबंधित बँकेकडून तपशील मागविला आहे. प्रताप सरनाईक यांनी मात्र अजूनपर्यंत कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले, तसेच पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड असल्याबाबतचा आरोपही फेटाळून लावला.टॉप्स सिक्युरिटी ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल सरनाईक यांची गुरुवारी ईडीने सुमारे साडेसहा तास चौकशी केली होती, तर २४ नोव्हेंबरला छापा टाकला होता. त्यावेळी त्यांचे पुत्र विहंग यांची ५ तास चौकशी केली होती.
सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 4:50 AM