- डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केल्यानंतर चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात बोलावील. या प्रकरणात ईडीने भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर याची चौकशी केली आहे.ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल केले असून, याच प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ईडीला सहा महिने लागतील. दाखल झालेले आरोपपत्र मराठीत असून, त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल. भाषांतरानंतर ईडीचे अधिकारी स्वत:च्या आणि एसीबीच्या निष्कर्षांमध्ये तुलना करून काही आरोपींना पुन्हा चौकशीसाठी बोलावतील. आम्हाला हा खटला अतिशय अचूक करायचा आहे.आम्ही सगळे पुरावे गोळा केल्यानंतर आमच्या चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात आणि सगळे प्रश्न विचारण्यासाठी छगन भुजबळ यांना बोलावू, असे हा अधिकारी म्हणाला. आधी आम्ही आरोपपत्र इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेऊन त्यातील तपशिलाचा अभ्यास करू. एसीबीच्या आरोपपत्रात काही मुद्दे आलेले नाहीत, असे आम्हाला आढळल्यास आम्ही काही आरोपींना पुन्हा बोलावून घेऊन ते प्रश्न त्यांना विचारू. ही सगळीच प्रक्रिया वेळ लागणारी असल्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला सहा महिने लागतील, असे त्याने सांगितले. समीर भुजबळ हा मी सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असल्यामुळे त्याच्या कंपन्यांमधील अनियमितांबद्दल मला काही माहिती नाही, असे सांगत आला आहे. परंतु त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचे संकेत या अधिकाऱ्याने दिले.महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात छगन भुजबळ यांनी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीच्या बैठकांमध्ये अनेक वस्तुस्थिती दडवून ठेवल्याचे आणि अशा बैठकांमध्ये उपस्थित असलेले मुख्य सचिव आणि अर्थ सचिव यांच्या निवेदनांचा तपशील आरोपांना बळकटी देण्यासाठी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असले तरी या गैरव्यवहारात त्यांना कसा फायदा झाला आहे हे एसीबी आरोपपत्रात सिद्ध करू शकलेली नाही.
ईडी आता छगन भुजबळांनाही बोलावणार
By admin | Published: February 27, 2016 2:28 AM