‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:00 AM2021-01-05T07:00:16+5:302021-01-05T07:01:14+5:30
ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे. त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आघाडी सरकारच्या काळात २००८ ते २०११ दरम्यान झालेल्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या
ठिबक सिंचन घोटाळ्याची चौकशी ईडीमार्फत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ईडीकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला.
ठिबक सिंचन अनुदानाचा विषय हा कृषी विभागांतर्गत येतो. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील ठिबक सिंचन घोटाळ्याचा विषय पुढे आला आहे. कृषी खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी वितरकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात अनुदान लाटले होते, अशा तक्रारी आहेत.
त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर चौकशीचे आश्वासन तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी २०११ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या आधारे कृषी खात्याच्या दक्षता विभागाकडून ईडीने
काही कागदपत्रे मागविल्याची माहिती आहे.
त्या काळात ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे.
त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.