रायपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्हय़ातील पठालगाव भागात गाव पंचायतीने एका ३५ वर्षीय आदिवासी शिक्षिकेला सर्वांसमोर विवस्त्र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गावाच्या बहिष्कारापासून वाचायचे असल्यास एक लाख रुपयांचा दंड भरण्याचेही तिला सांगण्यात आले.
पीडितेने आयोगासमक्ष आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग सांगितला. पीडित महिलेच्या भाचाचे (भावाचा मुलगा) गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. दोघेही एकाच जातीचे असून लग्न करू इच्छित होते. दोघांच्याही लग्नाची बोलणी सुरू असताना सदर विवाहेच्छुक मुलगी काही दिवस पीडित शिक्षिकेच्या घरी राहिली. तिचा भाचाही तिच्या घरी राहिला.
गावातील सरपंच नेहरू लकडा यांना हे कळताच त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि पीडित मुलीकडून वाईट कृत्य करवून घेत असल्याचा आरोप केला.
हा वाद १९ एप्रिल रोजी ग्रामसभेसमोर पोहोचला.
दबावाखाली सदर मुलीने पीडितेच्या भाच्यासोबत कुठलेही संबंध असल्याचा इन्कार केला. यामुळे पीडित शिक्षिकेला दोषी ठरवून सरपंचाने तिला व तिच्या नातेवाइकांना गावातून बहिष्कृत केले. बहिष्कृत व्हायचे नसेल तर सर्वांसमोर विवस्त्र होऊन एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे तिला फर्मावण्यात आले. तिने यास नकार दिल्यावर पंचायतीने तिला मारहाण करून विवस्त्र केले.
प्रकरण आयोगापर्यंत गेल्यावर याप्रकरणी पोलिसांनी सरपंच व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटकही करण्यात आली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
(वृत्तसंस्था)
-भाच्याच्या प्रेमप्रकरणावरून या महिलेचा छळ करण्यात आला. १९ एप्रिलला पठालगावाच्या पाकरगाव भागात ही घटना घडली. अत्याचाराची तक्रार घेऊन पीडित शिक्षिका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली असता पोलिसांनी तिला कुठलीच दाद दिली नाही.
-पुरावे गोळा करण्याच्या नावावर तिला ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे या महिलेने मानवाधिकार आयोग व महिला आयोगाकडे धाव घेतली.