लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार हा सहजानंद चौकातील झोजवाला कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून हाकला जात होता. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तेथील कार्यालय आता महापालिका मुख्यालयात सुरू केले जाणार आहे.शिक्षण समितीचे प्रशासकीय अधिकारी महापालिका मुख्यालयात बसत होते. तर, सभापतींचे कार्यालय झोजवाला इमारतीत होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी ते सोयीचे ठरत नव्हते. महापालिकेने २०१२ पासून महापालिका मुख्यालयात बंद असलेल्या कॅन्टीनच्या जागेत एलबीटी करवसुलीचे कार्यालय सुरू केले. मात्र, सरकारने आता एलबीटी बंद करून जीएसटी करप्रणाली लागू केली आहे. एलबीटी बंद झाल्याने त्या कार्यालयाची जागा शिक्षण समितीला मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे शिक्षण समितीच्या सभापती वैजयंती घोलप यांनी सांगितले. तत्कालीन महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी एलबीटी कार्यालयाच्या जागेत शिक्षण समितीचे कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. सध्याचे आयुक्त वेलारासू यांनीही त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे लवकरच ती कार्यवाही होईल. सध्याच्या घोलप यांना कामकाजासाठी जागा नसल्याने त्या महापालिका मुख्यालयातील महापौरांचे स्वीय सहायक संजय डवले यांच्या केबिनमध्ये बसत आहेत.परवानगी घेऊनच काममहापौरांच्या दालनाचा सभापतींनी ताबा घेतला. याविषयी घोलप यांना पत्रकारांनी विचारले असता महापौर दालनात काम करण्यास महापौरांची परवानगी घेऊनच बसले आहे. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्याने गैरसोयीअभावी काम करत आहे. ताबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पत्रकारांना त्यात गैर वाटत असल्यास त्यांनी त्यांच्या कक्षात मला जागा द्यावी, असेही घोलप यांनी सांगितले. सत्ताधारी पक्ष त्यांच्या सभापतीलाच दालन देऊ शकत नसल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
शिक्षण समितीचा कारभार आता मुख्यालयातून
By admin | Published: June 09, 2017 3:25 AM