- राहुल शिंदे पुणे : उच्च शिक्षण विभागाकडून पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाबाबत काढण्यात आलेल्या पत्रकामुळे शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू असताना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘भरणी श्राद्ध’ असल्याने रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काय झालेय शिक्षण विभागाला! असाच सवाल उपस्थित होत आहे.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी), लोणी काळभोर व जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता नववीच्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकावर आधारित तालुकास्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार रविवारी (दि.१0) इंग्रजी विषयाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार होते. मात्र, मुख्याध्यापक संघाच्या काही पदाधिकाºयांनी याच दिवशी भरणी श्राद्ध असल्यामुळे प्रशिक्षणाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती विकास संस्थेकडे केली होती. त्यावर मुख्याध्यापक संघाच्या विनंतीनुसार १0 सप्टेंबर रोजी घेतले जाणारे प्रशिक्षण रद्द करून येत्या १६ सप्टेंबर रोजी घेतले जाईल, अशा माहितीचा एसएमएस ‘व्हॉट्स अॅप’द्वारे सर्व शिक्षकांना पाठविण्यात आला.लोणी काळभोर येथील विकास संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, वेल्हा, दौंड, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर या तालुक्यांसह पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील केंद्रांवर प्रशिक्षण घेतले जात आहे़ हे प्रशिक्षण एकदाच घेतले जाणार आहे, त्यामुळे शिक्षकांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहणे आवश्यक होते़ याबाबत गटशिक्षण अधिकाºयांनीही संबंधितांना आवश्यक आदेश दिलेले आहेत़ उच्च शिक्षण विभागाकडून व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला विरोध करणाºया एका संस्थेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या. परिणामी विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून शासनाकडूनच धार्मिक गोष्टींचा प्रसार प्रचार केला जात असल्याचे समोर आले. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच पत्रक मागे घेतले जात असल्याची घोषणा केली. या घडामोडी घडत असताना मुख्याध्यापक संघाच्या विनंतीमुळे जिल्ह्यातील इंग्रजीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे शालेय शिक्षण विभागसुद्धा धार्मिक घटकांमध्ये अडकत चालला असल्याचे दिसून येत आहे.धार्मिक कार्यक्रमांमुळे प्रशिक्षण रद्द करावे, अशी मुख्याध्यापक संघाने मागणी केली नव्हती. संघातील एखाद्या व्यक्तीने मागणी केली असू शकते. शिक्षकांना रविवारी सुट्टी मिळाली नाही तर त्यांना बदली सुटी द्यावी लागते.त्यामुळे शिक्षण विभागाने हे प्रशिक्षण रद्द केले असावे.- महेंद्र गणपुले, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघंमुख्याध्यापक संघातर्फे शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भरणी श्राद्ध असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता होती. अधिकाधिक शिक्षकांना प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने १0 सप्टेंबर रोजीचे प्रशिक्षण येत्या १६ सप्टेंबर रोजी घेण्याचे शिक्षकांना कळविण्यात आले.- डॉ. राजेंद्र बनकर, प्रभारी प्राचार्य, डीआयईसीपीडी
भरणी श्राद्धामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द, काय झाले शिक्षण विभागाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 3:52 AM