लातूर : वडार समाज घर, रस्ते बांधणी अन् खडी फोडणारा कष्टकरी समाज आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी समाजातील मुलांना शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य तसेच ज्येष्ठांसाठी पेन्शन मिशन राबवू. त्यासाठी कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठित केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी दिली.लातुरातील राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर आयोजित वडार समाज महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे धर्मगुरू इमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांची उपस्थिती होती. मंचावर संभाजीराव पाटील-निलंगेकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, खा. डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद लिंबावळे, नागनाथ निडवदे आदीची उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले, वडार समाजाने सर्वांसाठी जगण्याचा आधार तयार केला. मात्र, आज हा समाज उपेक्षित आहे, ही चिंतनीय बाब आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ओबीसी, भटके विमुक्त, व्हीजेएनटी प्रवर्गातील समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून तीन हजार कोटी रुपये दिले आहेत.कामगार कल्याणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या समितीच्या माध्यमातून तीन महिन्यांत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. पारंपरिक व्यवसायाची जपणूक, खडी फोडणाºया कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणाची व्यवस्था होईल. मजूर सोसायट्या स्थापन करून त्यात आरक्षण देऊन प्रत्येकाला रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.घर बांधकामासाठी अतिरिक्त लाख रुपयेमुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर देण्याची योजना राबविण्यात येत आहे. वडार समाजातील कुटुंबासाठी केंद्राच्या निधीबरोबर राज्य सरकारकडून अतिरिक्त १ लाख रुपये देऊ. त्यामुळे या समाजातील कुटुंबास हक्काचे घर मिळेल. तसेच समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातचा प्रस्ताव सादर करावा. त्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.
वडार समाजासाठी शिक्षण, आरोग्य, पेन्शन मिशन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:27 AM