नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने आपली उमेदवारी कायम ठेवून पक्ष आदेश डावलणाऱ्यांची संख्या डझनभर असताना, शिवसेना नेतृत्वाने महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख लक्ष्मीबाई ताठे यांची पक्षातून एकीकडे हकालपट्टी केली. मात्र, दुसरीकडे महानगर प्रमुखांना थेट चोप देणाऱ्या विनायक पांडे यांना अभय दिल्याने ही बाब सामान्य सैनिकांना खटकली आहे. ताठे यांनी महापालिकेत अपक्ष उमेदवारी केल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली की, पांडे यांच्या कृत्यात त्याही सहभागी होत्या, म्हणून कारवाई झाली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात लक्ष्मीताई ताठे यांच्या हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून, पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी ही हकालपट्टी केल्याचे वृत्तात म्हटले आहे. ताठे या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांनी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधून सेनेकडून उमेदवारी मागितली होती. तथापि, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माघारी होण्यापूर्वीच पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
शिक्षा लक्ष्मीबाई ताठेंना, अभय विनायक पांडेंना!
By admin | Published: February 09, 2017 12:20 AM