तासिकाच होत नाहीत : प्राध्यापकही मारतात दांडी, धास्तावलेले विद्यार्थी महाविद्यालय बदलविण्याच्या तयारीतसुरेंद्र राऊत -यवतमाळयेथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम पूर्णत: बंद आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंअध्ययनाच्या भरवशावर तयारी करावी लागत आहे. दोन विभाग वगळता कुठेच शिक्षक तासिका घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यच अंधकारमय झाले आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाला सुमारे १९ विषय असून ६०० वर विद्यार्थी आहेत. मात्र येथे केवळ दोन अध्यापक कक्ष आहेत. त्यामध्ये नियमित तासिका घेणे शक्य होत नाही. इतकेच काय, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ग्र्रंथालयांमध्ये पुस्तकेही १९९८ पूर्वीची आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन संकल्पना येतात, त्याची पुस्तके येथे उपलब्ध करून दिली जात नाहीत. यात गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या ग्रंथालयात ग्रंथपालही उपस्थित राहात नसल्याने विद्यार्थ्यांनी नेलेल्या पुस्तकांची नोंद होत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तकेही हजारो रुपये किमतीची असल्याने ती विकत घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी लागणारी कुठलीही साहित्य सामग्री महाविद्यालयात उपलब्ध नाही. एमबीबीएस अभ्यासक्रमाचे अनेक विषय अत्यंत कठीण असून प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाशिवाय ते लक्षात येणे शक्य नाही. मात्र न्यायवैद्यकशास्त्र आणि औषधिशास्त्र हे दोन विभाग वगळता उर्वरित एकाही विभागातील प्राध्यापकांकडून तासिकाच घेण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बाह्यरुग्ण तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविले जाणे अपेक्षित आहे. अशा कुठल्याही तासिका या महाविद्यालयात होत नाहीत. औषध वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, नाक, कान, घसा शास्त्र, नेत्र रोगशास्त्र, अस्थिव्यंगोपचार शास्त्र, मानसोपचार शास्त्र यासह क्लिनिकलशी निगडित विभागाकडून क्लिनिकल पोस्टिंग विद्यार्थ्यांना दिली जात नाही. बरेचदा बाह्यरुग्ण विभागातील तपासणी कक्षात ९ ते दुपारी १२ पर्यंत विद्यार्थी बसून असतात. एकही प्राध्यापक त्यांची विचारपूस करीत नाही. एखादवेळी विद्यार्थ्यांनी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. विद्यार्थ्यांची उपस्थितीही घेतली जात नाही. शेवटच्या एका महिन्यात हा अभ्यासक्रम समजून घेणे शक्य नाही. याचा ताण शेवटी विद्यार्थ्यांवर येतो. महाविद्यालयाचे स्वतंत्र असे क्लिनिकल पोस्टिंगचे कोणतेही वेळापत्रक नाही. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने २००७ मध्ये तयार केलेल्या वेळापत्रकावरच येथे काम चालू आहे. महाविद्यालयात वर्ग बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. महाविद्यालयाकडून प्रत्येकाचे खोटे हजेरीपत्रक दाखविले जात आहे. त्यामुळेच या महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाला कुठेच आपला ठसा उमटविता आला नाही. महाविद्यालय प्रशासनाकडून एमसीआयच्या पथकाचीही दिशाभूल केली जाते. त्यांना येथील उणिवा दाखविण्यात येत नाही. त्यामुळेच महाविद्यालयात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
यवतमाळात वैद्यकीय शिक्षणाचा ‘घो’
By admin | Published: January 20, 2015 1:15 AM