सिंधुदुर्ग: विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १६ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्गनगरीतील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारपासून सुरू होते. या अधिवेशनाच्या दुस-या आणि समारोपाच्यादिवशी शिक्षणमंत्री तावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, संघटनेचे राज्याध्यक्ष काळु बोरसे -पाटील आदी उपस्थित होते.विविध स्पर्धा परीक्षात विद्यार्थ्यांची क्षमता वाढावी, तसेच विद्यार्थ्यांची एकूणच गुणवत्ता वाढावी यासाठी या इंटरनॅशनल बोर्डाची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगून शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १00 शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांतील शिक्षकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले माध्यमिक शालांत परिक्षेत सध्याचे विषय १0 ते १२ आहेत या विषयांमध्ये वाढ करुन रोजगाराच्या संधी निर्माण होणा-या विषयांचा समावेश करावा किंवा कसे याबाबत विचारविनिमय सुरु आहे. विषय वाढल्यामुळे राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण मिळण्याबरोबरच रोजगार युक्त शिक्षण घेण्याची संधी निर्माण होईल.गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने कंपनी शाळांना परवानगी दिल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले २00९ सालापासून प्रलंबित असणारे २0 टक्के टप्पा अनुदान आमच्या शासनाने सुरु केले आहे. ?इंग्रजी माध्यमांची ३५ हजार मुले मराठी माध्यमाकडेप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षक आणि लोकसहभाग यांच्या सहकार्यातून प्रगत शिक्षणामध्ये राज्य तिस-या क्रमांकावर आले आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील ३५ हजार मुले मराठी शाळेत प्रवेश घेतात. हे या योजनेचे मोठे यश आहे. याबाबत नागपूर अधिवेशनात विधानसभेत शिक्षकांचा अभिनंदन ठराव करुन शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद करणे, शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करणे आदीबाबत समन्वयाने सुयोग्य तोडगे काढले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करणार : पंकजा मुंडेशिक्षकांनी तन्मयतेने केवळ ज्ञानदानाचे काम करावे व विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच शिक्षकांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. मुंडे पुढे म्हणाल्या शिक्षकांनी आत्तापर्यंत एमएच -सीआयटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. आता ३१ मार्च २0१८ पर्यंत सर्व शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावे यानंतर ही मुदत वाढवली जाणार नाही. आॅनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत झाले आहे. याबाबत अजूनही काही अडचणी असतील अशा शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात. मे २0१८ पर्यंत या बदल्या केल्या जातील. शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्यासाठी हे धोरण अवलंबिले आहे. याचा लाभ घेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कामगिरी उत्तमपणे पार पाडावीत असे आवाहन त्यांनी केले.मार्च पर्यंत संपूर्ण जिल्हा डिजीटल करणार : दीपक केसरकरसिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे हे इथल्या शिक्षकांचे योगदान आहे. प्राथमिक शिक्षक गुणवंत विद्यार्थी कसे घडवितात याचे हे आदर्श उदाहरण आहे. डिजिटल व ईं- लर्निंग हा प्रगत शिक्षण अभियानातला उपक्रम आमच्या जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत ६00 हून अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा येत्या मार्चअखेर पर्यंत डिजिटल करुन संपूर्ण जिल्हा डिजिटल शाळायुक्त करणार आहे.आॅनलाईन बदल्यांचे धोरण यशस्वी : दादा भुसेग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक हा सुध्दा माणूस आहे. त्याला कुटुंब आहे. शिक्षक चिंतामुक्त असेल तर तो ज्ञानदानाचे काम उत्तमपणे करु शकतो या अनुषगांने शासनाने आॅनलाईन बदल्याचे धोरण स्विकारले आहे. शासन सढळ भावनेने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. याला शिक्षकांनी उत्तम कार्य करुन सहकार्य करावे.जबाबदारीचेही भान ठेवा : नारायण राणेमाजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले की, जर्मनीसारखा देश प्राथमिक शिक्षणाच्या बळावरच मोठा झाला आहे. या देशात गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण दिले जाते. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार प्राथमिक शिक्षण महत्वपूर्ण आहे. समितीच्या सदस्यांनी हक्क व कर्तव्याबरोबरच आपल्या जबाबदारीचेही आठवण ठेवावी.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १६ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्गनगरीतील अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार, राजन तेली आदी उपस्थित होते. (छाया : विनोद परब)
महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:54 PM