ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 - खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षातुन एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतू नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्यास त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल. अशी भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कलचाचणी अॅप सुविधेचे उद्घाटन कासारवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर लगेच मुख्यमंत्री निघुन गेले. या उद्घाटन समारंभप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे बोलत होते. ते म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांना प्रतिवर्षी शैक्षणिक शुल्क वाढविता येणार नाही. दोन वर्षातून एकदा १५ टक्यापर्यंत शुल्कवाढ करता येईल. पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांशी समन्वय साधून संस्थांनी शुल्कवाढीचा निर्णय घ्यायचा आहे. संस्था परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाही. शाळांमध्ये पालक शिक्षक संघ स्थापन करणे कायद्याने बंधनकारक केले आहे.
पालक शिक्षक संघटना (पीटीए) स्थापन करून संस्थाचालक त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्यात सहभागी करतात. त्यामुळे पालकांचे प्रतिनिधी म्हणुन त्यांच्या मर्जीतील लोकांशी समन्वय साधून शुल्कवाढीचा निर्णय संस्था घेतात. हा प्रकार सर्वसामान्य पालकांसाठी अन्यायकारक आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला,त्यास उत्तर देताना तावडे म्हणाले, अवाजवी शुल्कवाढ केली जात असेल, एखाद्या संस्थेत मनमानी कारभार सुरू असेल तर पालकांनी तक्रार द्यावी. त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
कलचाचणी २०१७ या उपक्रम स्तुत्य
कलचाचणी वेब पोर्टल, अॅप, हेलपलाईन सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्यामची आई फौंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, संचालिका शीतल बापट उपस्थित होते. महाकरिअरमित्र अॅप नावाचे हे अॅप असून महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम कार्यन्वीत करण्यात आला आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत नेमके काय केले पाहिजे,याची निवड सोपासणारा हा सेतू आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी उपयुक्त असा उपक्रम आहे. दहावीच्या सुमारे १६ लाख,६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. सात क्षेत्रिय अभिरूची कसोटीत त्यांचा कल जाणून घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.