ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला परिक्षेत नापास करण्याची धमकी देणारा शिक्षक विजय कौतीकराव बावस्कर याला सत्र न्याय दंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला एका महिना कारावास भोगावा लागेल. तसेच दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली की, सदर मुलगी एन-११, हडको येथील एका शाळेत ६ वीच्या वर्गात शिकत होती. त्या शाळेत आरोपी विजय बावस्कर हा सहाय्यक शिक्षक म्हणुन इतिहास, भूगोल व नागरिक शास्त्राचा विषय शिकवत होता. ४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी सदर मुलगी ही शाळेत गेली होती.९ ते १० वाजेच्या सुमारास पिडीतेच्या वर्गावर आरोपी बावस्कर याचा तास होता. तेंव्हा बावस्कर याने पिडीत मुली जवळ जावुन तीच्या सोबत वर्गातील सर्व विद्यार्थ्यां समोर अश्लील वर्तन करुन तीची छेड काढली. त्यामुळे ती मुलगी घाबरुन बाजुला झाली. त्यावेळी बावस्करने मुलीला या घटनेची वाच्यता कोणाकडे केल्यास परिक्षेत नापास करण्याची धमकी दिली. पिडीत मुलगी भयभीत होऊन घरी गेली असता तीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. ५ जानेवारी २०१२ रोजी पिडीतेच्या आईने सिडको पोलिस ठाण्यात शिक्षक बावस्कर विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी पिडीत मुलीसह इतर विद्यार्थ्यांचा जबाब नोंदविला. १ जानेवारी २०१२ रोजी बावस्करला अटक केली. तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील एन. एन. पवार यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने शिक्षक बावस्कर याला विनयभंगाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३५४ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.