पुणे : आधुनिक शिक्षणव्यवस्थेपुढे विविध आव्हाने आहेत. प्रशिक्षणातून कुशल कामगार तयार होतील. त्यासाठी शिक्षणाचे बाजारीकरण व व्यापारीकरण होऊ न देता काम करणाऱ्या डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासारख्या व्रतस्थ लोकांची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. डॉ. शां. ब. मुजुमदार कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने डॉ. मुजुमदार व त्यांच्या पत्नी संजीवनी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांत आपले एकही विद्यापीठ नसले तरीही असंख्य चांगले विद्यार्थी आपल्याच शिक्षण व्यवस्थेने तयार करून जगाला दिले आहेत. जगाचे उत्पादनाचे हब बनण्याची संधी अमेरिका, चीननंतर आता भारताकडे चालून आली आहे. अशी संधी १०० वर्षांनंतर एखाद्या देशाला मिळत असते. त्यामुळे त्यासाठी चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ देशाला लागणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षणातूनच युवा घडवावे लागतील. त्यासाठी अशा संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.तब्बल ८० देशांतील ३० हजार मुले सिम्बायोसिसमध्ये शिकत आहेत. हे साकारण्यासाठी लागणारी प्रेरणा व संस्कार डॉ. मुजुमदारांना कोल्हापूरने दिले आहेत. मात्र जगात सर्वत्र पोहोचायचे असेल तर पुण्याकडेच यावे लागते. तशी सिम्बायोसिस पुण्यातूनच जगभरात पोहोचली आहे. संस्थाविस्तार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे व जगभरातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय त्यांनी साकारले आहे, असे पवार म्हणाले. डॉ. मुजुमदार यांच्या कामात नवसर्जनशीलता, अनुकंपा, आत्मीयता आहे. सिम्बायोसिस ही संस्था जागतिक दर्जाची असून, येणाऱ्या काळात शिक्षण हेच खरे भविष्य असणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
शिक्षणाचे बाजारीकरण रोखणारे व्रतस्थ हवेत
By admin | Published: August 10, 2015 12:52 AM