विलास जळकोटकर
सोलापूर : शिक्षणाची संधी हुकलेल्या विविध वयोगटातील मंडळींना आता सोयीनुसार इयत्ता पाचवी, आठवी, दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात सुरु होणाºया शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पूर्वी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग (एन.ओ.आय.एस.) या दिल्लीच्या संस्थेमार्फत राज्यस्तरावर १ ली ते १० पर्यंत मुक्त शिक्षण दिले जायचे. महाराष्टÑात १४ जुलै २०१७ ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या बैठकीद्वारे महाराष्टÑ मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना झाली. यानंतर २१ डिसेंबर २०१८ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. आता जून २०१९ पासून राज्यभर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्वांना शिक्षण घेता येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाºयांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापुरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. सध्यस्थितीत १ ली ते १० पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात राज्यातील विविध टप्प्यांवर गळती होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने ती रोखण्यासाठी राज्य मुक्त मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षणापासून दूर राहिलेल्या व्यक्तींनी आपल्या पसंतीनुसार विषयांची निवड करून आपल्या सोयीनुसार शिक्षण घेण्याच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
काय आहेत योजनेची उद्दिष्टे
- - औपचारिक शिक्षणाला समकक्ष शिक्षणपद्धती सुरु करणे
- - शालेय शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करणे
- - शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती, दिव्यांग, गृहिणी,कामगार, खेळाडूंना समकक्ष शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे
- - नियमित शाळेच्या वेळेत जे उपस्थित राहू शकत नाही अशांसाठी संधी उपलब्ध करुन देणे.
- - स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांना सोयीनुसार शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे.
असा असेल अभ्यासक्रम
- - महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्याप्राधिकरण) पुणे आणि महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्यामार्फत इ. १ ली ते १० वीसाठी निश्चित केलेल्या विषय योजनेतील विषयांसाठी त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके लागू राहतील.
- - इ. ५ वी, ८ वी, १० वीसाठी कला विषयांतर्गत सृजनात्मक कला निर्मिती (चित्रकला हस्तकला, रंगकाम), भारतीय संगीत (गायन, वादन, नृत्य), गृहोपयोगी व शालोपयोगी साहित्य निर्मिती (दिव्यांगासाठी) यांचा अभ्यासक्रम व स्वयंअध्ययन साहित्य महाराष्टÑ राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत तयार करण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांनी स्पष्ट केले.
वैशिष्ट्ये
- - सोयीनुसार अध्ययनाची संधी
- - विषयाची लवचिकता
- - अतिप्रगत विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे अनेक विषयांचे पर्याय उपलब्ध करुन देणे
- - सर्वांसाठी शिक्षण व्यवस्था
- - दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषय योजना