यदु जोशी
मुंबई : चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मिळविलेली सत्ता लक्षात घेता या पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत ४२चा आकडा गाठण्यासाठीच्या महाराष्ट्र भाजपच्या प्रयत्नांना त्यामुळे बळ मिळेल. भाजप आणि मित्रपक्षांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला ठोस रणनीती आखावी लागणार आहे.
लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर असताना मिळालेले हे यश महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरले आहे. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने सरकार स्थापन केले होते. यावेळी भाजपचा तेथे पराभव झाला असता तर काँग्रेसचे सरकार पाडण्याचा राग मतदारांनी व्यक्त केला, असा तर्क दिला गेला असता आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही रोष आहे आणि तो लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्यक्त होईल, असे म्हटले गेले असते. मात्र, हा तर्क महाराष्ट्रातही लागू होणार नाही असा मुद्दा रेटण्यासाठीचे ठोस कारण महाराष्ट्रातील भाजपला मिळाले आहे.
माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांचा तेलंगणातील यशात वाटाकाँग्रेसने तेलंगणामध्ये मिळविलेल्या मोठ्या विजयाच्या शिल्पकारांपैकी दोन नेते महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे अ.भा. काँग्रसचे तेलंगणासाठीचे प्रभारी आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तेलंगणामध्ये काँग्रेसचे निवडणूक प्रभारी होते. ठाकरे-चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नेत्यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
चार राज्यांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक २२ सभा अन् रोड शो आज निकाल जाहीर झालेल्या चार राज्यांपैकी तेलंगणा वगळता इतर तीन ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. तेलंगणातही त्यांनी प्रचार केला. ४ राज्यांमध्ये त्यांनी २२ सभा घेतल्या आणि रोड शो केले. बहुतेक ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचाराला गेले होते. भाजपच्या राज्यातील तीस आमदारांना मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील उमेदवार निश्चित करताना मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मोदींचा चेहरा समोर ठेवून फक्त लोकसभा निवडणूक जिंकता येते या समजाला तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाने छेद दिला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधून व्यवसाय आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता मुंबईत भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. महाविकास आघाडीसमोरील आव्हाने आता वाढतील. शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याबाबत जागावाटप वाटाघाटीची भाजपची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत राज्यातील सध्याचे मंत्री, आमदारांना उतरवले जाऊ शकते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. तिथे पक्षाला रेकॉर्डब्रेक यश मिळाले. अनेक घटक महत्त्वाचे होते, असे त्या म्हणाल्या.