सांगली : राज्यभरात कारखाने हडप करणारी एक टोळी तयार झाली असून जयंत पाटील त्याचे सदस्य आहेत. त्यामुळेच व्यंकाप्पा पत्की यांचा पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाआडून जयंतरावांचे राजकीय कारस्थान सुरू आहे, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, व्यंकाप्पांच्या पुतळ्यास आमचा विरोध नाही. पुतळा उभारायचाच असेल तर तो आम्हीसुद्धा उभा करू शकतो. मात्र पुतळा उभारण्याच्या कृतीमागे राजकीय खेळी खेळली जात आहे. केवळ कारखाना डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचे राजकारण केले जात आहे. पत्कींचा पुतळा उभारण्याचा जयंतरावांना अधिकारच काय? कारखाना चालवायला दिला होता, त्याची मुदत संपली आहे. लवादाने निर्णय दिल्यानंतरही ते कारखाना सोडण्यास तयार नाहीत. कधी ४२ कोटी, कधी ८४ कोटी मागणारे जयंत पाटील आता या कारखान्यासाठी शंभर कोटी रुपये मागत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा कारखाना सभासदांचा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे असे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. व्यंकाप्पा पत्की यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय संचालक मंडळ, अध्यक्ष व हजारो सभासदांना अंधारात ठेवून घेतला आहे. सर्वोदय कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, भाडोत्री असणाऱ्या राजारामबापू कारखान्यास व त्याचे सर्वेसर्वा असणाऱ्या जयंतरावांना हा मालकी हक्क दिला कुणी? या कारखान्याची स्थापना ही समाजवादी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या संघर्षातून झाली आहे. माझ्यासह व्यंकाप्पा, प्रा. शरद पाटील यांच्या प्रयत्नातून कारखान्याची संकल्पना सत्यात उतरली आहे. अरबी उंट तंबूत घेतल्यानंतर, खुंटीसह तंबू घेऊन उंट पळून गेल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही जयंत पाटील यांनी कारखाना ताब्यात दिला नाही. त्यांनी त्यांची लबाडी सुरूच ठेवली आहे. भाड्याने कारखाना चालविण्यास दिल्यानंतर आता सर्वोदय कारखान्याला राजारामबापू कारखाना युनिट क्र. ३ असे नाव पाडले जात आहे. हासुद्धा कारस्थानाचाच भाग आहे. सभासद, शेतकऱ्यांची अस्मिता व हक्क गहाण ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शोभणार नाही. त्यामुळे या कृत्याचा मी निषेध करीत आहे. त्यांच्या कारस्थानांना विरोध करतानाच न्यायालयीन लढाई सुरू आहे. यातून आम्हाला निश्चित न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बापूंचा एकही गुण नाही..!राजारामबापूंना आम्ही उगीचच गुरूस्थानी मानले नव्हते. एका पदयात्रेत बापूंच्या पायाला फोड आल्यानंतर आम्ही त्यांच्या पायाला तेल लावले होते. इतकी निष्ठा आणि श्रद्धा आम्ही जपली. मात्र जयंत पाटील यांच्यात एक टक्काही राजारामबापूंचे गुण नाहीत, हे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंतरावांना बसविण्यात वसंतदादांचा हात होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. या कोणत्याही गोष्टीची जाण त्यांना नाही, असे पवार म्हणाले. व्यंकाप्पा व जयंतरावांची खलबतेनैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना अडचणीत आल्यानंतर तीन वर्षाच्या करारावर राजारामबापू कारखान्याशी ‘सर्वोदय’चा करार करण्याबाबत जयंतराव व व्यंकाप्पा यांच्यात खलबते झाली होती. पत्कींवर विश्वास ठेवून भागीदारी केली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र पत्कींवर टीका करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीच्या वसंतदादाकारखान्यावर आता त्यांचा डोळा...जत, आरग, सर्वोदय असे एकापाठोपाठ एक कारखाने हडप करणाऱ्या जयंत पाटील यांचा डोळा आता वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यावर आहे. या कारखान्याची वाट लावण्यासाठी कारस्थान केले जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची चर्चासुद्धा एकेठिकाणी झाली होती. त्यांच्या कुटिल राजकारणाचा हा शेवटचा टप्पा असेल, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
पुतळ्याआड जयंतरावांचे कारस्थान
By admin | Published: November 22, 2015 11:00 PM