समीर परांजपे -
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगडसहित महाराष्ट्रातील १४ किल्ले तसेच कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याकरिता युनेस्कोला महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खाते एक विस्तृत प्रस्ताव पाठविणार आहे. तो प्रस्ताव तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून पुरातत्त्व खात्याने निविदा मागविल्या आहेत. त्या प्रक्रियेनंतर विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे काम आगामी दीड वर्षांत मार्गी लागेल.हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्राने पाठविलेला प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोने तत्त्वत: स्वीकारला आहे. मात्र ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी कशी योग्य आहेत व त्यांचे जतन कसे केले जाईल याचा एक विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांकडून तयार करून घ्यावा लागतो. तो युनेस्कोला सादर केल्यानंतर त्यांची तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. त्यानंतरच त्या स्थळांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत युनेस्को निर्णय घेते. दरवर्षी १८ एप्रिलला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील मराठा लष्करी स्थापत्य व गनिमी कावा या दोन गटांत १४ किल्ल्यांचा समावेश करून तो प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला होता. हीच प्रक्रिया महाराष्ट्रातील कातळ शिल्पांबाबतही पार पाडण्यात आली. गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
या प्रमुख कातळ शिल्पांचा समावेशमहाराष्ट्रातील कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण,अक्षी, कुडोपी व गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
कोणते आहेत १४ किल्ले?-रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा किल्ला), सुवर्णदुर्ग, खांदेरी
हजारो वर्षांपूर्वी चितारण्यात आलेली महाराष्ट्रातील कातळ शिल्पे हे देशाचे महत्त्वाचे सांस्कृतिक संचित असून ते नीट जतन व्हायला हवे, असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे.
विस्तृत प्रस्ताव तयार करणार -कातळ शिल्पांना आणि किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावाला युनेस्कोने तत्त्वतः मंजुरी दिली. पुढील टप्प्यात या ठिकाणांचा विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांच्या सहभागातून तयार करून तो युनेस्कोला पाठविला जाईल. - डॉ. तेजस गर्गे, संचालक, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग