ठाणे - २०१६ मध्ये आरंभ झालेली वृक्ष लागवडीची महामोहिम २०१७ मध्ये सुध्दा विक्रमी ठरली असून हे यश लोकसहभागाचे आहेच त्यासोबतच वन विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांच्या परिश्रमाचा सुध्दा यात सिंहाचा वाटा आहे. यावर्षी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने देखील उत्तम नियोजन करावे आणि पुन्हा एकदा विक्रमाची नोंद करत हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे 12 व्या वरिष्ठ वनाधिका-यांच्या परिषदेत उद्घाटनप्रसंगी वनमंत्री बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव ए.के. मिश्रा यांच्यासह वरिष्ठ वनअधिका-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याचप्रमाणे वन विभागाशी संबंधित इतर महत्वपुर्ण विषयांबाबत सुध्दा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावर्षी होणारी 13 कोटी वृक्ष लागवड हे वन विभागाचे मुख्य उद्दिष्ट असून या लक्ष्यपुर्ती साठी प्रत्येकाने स्वत:ला झोकून देत हे ईश्वरीय कार्य पुर्णत्वास न्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मेल व्याघ्र, निसर्ग परिचय शिबीर, वेस्टर्न महाराष्ट्र डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना प्रोग्रेस रिपोर्ट 2015 ते 2018 या पुस्तकांसह काटेपुर्णा अभयारण्य या सीडीचे विमोचन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही परिषद दोन दिवस चालणार आहे.