मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 'सिल्व्हर ओक'वर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली.
याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि आमदारांना महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करा, असा आदेश दिला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, "शिवसेनेत अंतर्गत काय सुरु आहे, याची मला माहिती नाही, राष्ट्रवादीचे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना सहकार्य करतील. राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत असेल," असे जयंत पाटील म्हणाले.
याचबरोबर, "मुंबईतील शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला जाणार नाहीत, असे वाटत होते. तसेच, ते फुटतील अशी अपेक्षा नव्हती. काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद नाही," असेही जयंत पाटील म्हणाले. याशिवाय, आजच्या सध्याचा राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार टिकावं, यासाठी चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे गेलेले आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे. सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.