मुंबई - गर्वाचं घर खाली, अशी म्हण मराठीत आहे. हीच म्हण महाराष्ट्रातील राजकारणात अगदी चपखल बसल्याचं सध्या दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना या म्हणीचा बोध होईल, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात झाली आहे.
घसा कोरडा पडेपर्यंत मी पुन्हा येईल...मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल ओरडून सांगणारे मुख्यमंत्री जेव्हा शरद पवारांचा काळ संपला म्हणत होते, त्याचवेळी त्यांना देखील अहंकाराने घेरलं असा विचारप्रवाह निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील जनतेने ही बाब लक्षात घेत भाजपला बहुमताच्या आकड्यापासून गेल्यावेळपेक्षा आणखी दूर नेले.
दरम्यान निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संघ प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याने भाजपने अतिआत्मविश्वासाची कोणती पातळी गाठली हे दाखवून दिले. भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे.
राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळे भाजपकडून युती जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला टाळी दिली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र ही शक्यताही आता मावळल्याचे चित्र आहे. तर भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. भाजपला केवळ अहंकार नडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.