नवी मुंबई : कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना इजिप्तवरून आलेल्या कांद्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुण्यापेक्षा इजिप्तहून आयात केलेला कांदा २० रुपयांनी स्वस्त असून, तो ४५ ते ५० रुपये दराने विकला जात आहे.आवक घटल्याने राज्यात कांद्याचे भाव जवळपास ८० रुपयांपर्यंत पोहोचलेले असताना परदेशातून कांदा आयात करण्यास सुरुवात झाली आहे. तामिळनाडूतील एलिगेंस फूड्स कंपनीने इजिप्तमधून तीन कंटेनरमधून ८४ टन कांदा गुरुवारी उरणमधील जेएनपीटी बंदरात दाखल झाला. सीमा शुल्क विभागाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर श्री स्वामी समर्थ शिपिंग कंपनीचे मालक सचिन कुबल यांनी हा कांदा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिला़आयात केलेला कांदा चांगल्या दर्जाचा असून, तो गडद लाल रंगाचा असल्याने त्याला मुंबईकर ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. शनिवारी हा कांदा तामिळनाडू तसेच मुंबई व पुणे परिसरात पाठविण्यात आला आहे. बुधवारी अजून १ हजार टन कांदा इजिप्तहून येणार आहे. आयात केलेला कांदा बाजारात आल्यानंतर भाव अजून कमी होतील, अशी माहिती सचिन कुबल यांनी दिली. (प्रतिनिधी)निर्यात मूल्यात वाढ मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात मोठी घट झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या कडाडलेल्या भावाने केंद्र सरकारची चिंता वाढविली आहे. निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन २७५ डॉलरने वाढवून ७०० डॉलर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इजिप्तमधून आलेला कांदा २० रुपये स्वस्त
By admin | Published: August 23, 2015 4:58 AM