अतुल जयस्वाल / अकोलामातेकडून तिच्या बालकांमध्ये एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘अर्ली इन्फॅन्ट डायग्नोसिस’ (ईआयडी) कार्यक्रम अनेक बालकांसाठी वरदान ठरत आहे. आतापर्यंत शेकडो बालकांना एचआयव्हीच्या संक्रमणापासून वाचविण्यात यश आले आहे.मातेकडून होणारे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ‘प्रिव्हेन्शन आॅफ पॅरेंट टू चाईल्ड’ (पीपीटीसीटी) कार्यक्रम २००२ पासून हाती घेतला आहे. यामध्ये प्रत्येक गर्भवती महिलेचे समुपदेशन करून तिची एचआयव्ही चाचणी करण्यात येते. महिला एचआयव्हीग्रस्त आढळल्यास तिच्यावर चौथ्या महिन्यापासून ‘एआरटी’ औषधोपचार करण्यात येतो, तसेच जन्मलेल्या बालकावरही त्याच्या वजनाच्या प्रमाणात औषधोपचार सुरू केला जातो. या कार्यक्रमांतर्गतच वर्ष २०१२ पासून ‘अर्ली इन्फॅन्ट डायग्नोसिस’ (ईआयडी) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मातेच्या गर्भातूनच त्याचे रक्त नमुने घेतले जातात. या नुमन्यांची ‘डीबीएस’ आणि डीएनए-पीसीआर चाचणी केली जाते. त्यात सकारात्मक अहवाल आल्यास बाळावर जन्मताच औषधोपचार सुरू केला जातो आणि त्याला अन्य आजारांपासून वाचवून त्याची आयुर्मर्यादा वाढविता येते.२८५६ बालकांचे घेतले नमुनेया कार्यक्रमांतर्गत राज्यभरात वर्ष २०१२ पासून २८५६ बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते पुणे येथील ‘नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (नारी) या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर यापैकी केवळ १४० बालकांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे आढळून आले.प्रत्येक आईने गरोदरपणातच एचआयव्हीची चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे. लवकर निदान झाल्यास होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संक्रमणापासून वाचविता येऊ शकते. - माधुरी येळणे, समुपदेशक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
‘एचआयव्ही’ग्रस्तांच्या बालकांसाठी ‘ईआयडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 3:44 AM