औरंगाबाद-
कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. रमजान ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे. तर नमाज अदा करताना इम्तियाज जलील भावूक झालेले पाहायला मिळाले. नमाज अदा करत असताना इम्तियाज जलील त्यांच्या आईच्या आठवणीनं भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
नमाज अदा केल्यावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी आईची आठवण झाल्यानं भावूक झाल्याची माहिती दिली. "ईद ही माझी आई आहे आणि माझ्या आईचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं. तिच्या आठवणीनं मी भावूक झालो. आई ही शेवटी आई असते. तिचं स्थान सर्वांपेक्षा मोठं असतं", असं इम्तियाज जलील म्हणाले.
देशात शांतता नांदावी हिच इच्छानमाज अदा करताना देशात शांतता नांदावी, बेरोजगारी दूर व्हावी हीच दुआ केल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. देशात बंधू-भावानं सर्व राहावेत हिच इच्छा असल्याचं जलील म्हणाले. दिल्ली, मध्य प्रदेशात गरिब मुस्लिम नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इम्तियाज जलील यांनी दंडावर काळी पट्टी बांधली होती. देशात आज गरिब मुस्लिमांवर बुलडोजर चालवून त्यांना बेघर केलं जात आहे. याच्या विरोधात आम्ही आहोत, असंही ते म्हणाले.