नाशिक: इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (दि.14) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा शहर-ए-खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मगुरूंच्या विभागीय बैठकीत बुधवारी संध्याकाळी करण्यात आली.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ईदवर सावट आहे. यामुळे यावर्षीही शहरातील शहाजहाँनी ईदगाह मैदानावर सामुदायिकरित्या नमाजपठणाचा सोहळा होणार नसल्याचे खतीब यांनी बोलताना स्पष्ट केले. यामुळे ईदगाह यंदाही सुने-सुने राहणार आहे. समाजबांधवांनी आपापल्या घरात ईदचे नमाजपठण करावे असे आवाहन सर्व धर्मगुरूंनी केले आहे.
रमजान ईद, बकरी ईद हे दोन प्रमुख सण मुस्लीम बांधवांचे सर्वात मोठे सण म्हणून ओळखले जातात. या सणाच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार नमाजपठण केले जाते. 'शिरखुर्मा' हे रमजान ईदचे विशेष आकर्षण असते. हे खाद्यपदार्थ दुधापासून तयार केलेले सुकामेव्याचे द्रवरूप मिश्रण असते.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनाची साथ तेजीत असून संसर्ग शहरासह ग्रामिण भागातसुद्धा अधिक फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहे. सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महिनाभरापासून सर्व धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आले आहेत. येत्या बुधवारपासून नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. यामुळे यंदा समाजबांधवांना ईदची नमाज आपापल्या घरांमध्येच पठण करावी लागणार असल्याचे दिसते. कोरोनाचे संकट बघता समाजबांधवांनी यावर्षीही ईद ची खरेदी पुढे ढकलली आहे. बाजारपेठा बंद असल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंसाठी राबणाऱ्या विविध संस्थांचे हात बळकट करण्यासाठी समाजबांधव प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. महिनाभरापासून कोरोनाची तीव्र झालेली साथ, रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता 'जकात', 'फित्रा'च्या माध्यमातून समाजातील धनिक वर्ग गोरगरीब कुटुंबांपर्यंत आर्थिक स्वरूपात दान तसेच धान्यदान पोहच करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश सामाजिक सेवाभावी संस्थांनी अशा कुटुंबांचा शोध घेत 'रमजान किट' अर्थात शिरखुर्मासाठी लागणारा सुकामेवा, किराणा वस्तू पुरविण्यास सुरुवात केली आहे.