मुंबई : बहुजन समाज पार्टी ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले असून, या उमेदवारांच्या प्रचारास बसपाच्या स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती चार दिवसांचा प्रचार दौरा करणार आहेत. या दौ:यात त्या आठ सभा घेणार असून, आणखी दोन सभा आयोजित करण्याचे प्रयत्न राज्यातील नेत्यांकडून सुरू आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार दिले होते. उमेदवारांना चांगला जनाधार मिळाल्याने बसपाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या स्टार प्रचारक मायावती यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून, यामध्ये बसपा मागे राहू नये यासाठी मायावती यांच्या सभांचा झंझावात राज्यात होणार आहे. 7 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत मायावती यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. 7 ऑक्टोबर रोजी 12 वाजता नाशिक आणि दुपारी 2 वाजता ठाणो येथील सेंट्रल मैदानात सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील उमेदवारांसाठी ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. 8 तारखेला 12 वाजता जालना आणि दुपारी 2 वाजता नांदेड येथे, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर आणि 2 वाजता पुणो, 10 रोजी दुपारी बारा वाजता भंडारा आणि 2 वाजता नागपूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)