मुंबई : आठ तासांची ड्युटी असण्याची मुंबई पोलीस दलाची मागणी आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहर व उपनगरातील काही पोलीस ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर अधिकाऱ्यांना व अंमलदारांना आठ तासांच्या ड्युटीचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास सर्व पोलीस ठाण्यांत ते लागू केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.अर्थसंकल्प अधिवेशनावेळी एका महिला कॉन्स्टेबलच्या पत्नी यशस्वी पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीसह या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे एका पोलीस हवालदाराने केलेल्या अर्जानुसार आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी महिन्याभरापूर्वी पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचे नियोजन करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार अभ्यास करून २४ तासांचे तीन टप्प्यांत वेळापत्रक करून आठ तासांची ड्युटी दिली जात आहे. पोलिसांवरील वाढत्या कामाच्या ताणामुळे प्रत्येक पोलिसाला रोज किमान १२-१३ तास ड्युटी करावी लागत असून, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागत आहे. आठ तासांच्या ड्युटीसाठी सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री अकरा व रात्री अकरा ते सकाळी सातपर्यंत, असे त्याचे नियोजन केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मुंबई पोलिसांना आठ तासांची ड्युटी?
By admin | Published: May 06, 2016 2:56 AM