मुंबई: राज्यातील आणखी ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. सांगलीत ४, मुंबईत ३ आणि साताऱ्यात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरुन आले आहेत.गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली होती. आता त्यात आणखी ८ जणांची भर पडलीय. या आठ जणांमध्ये सांगलीच्या ४, मुंबईच्या ३ आणि साताऱ्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. याआधी रविवारी राज्यात १० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. त्याआधी राज्यात जमावबंदी लागू होती. मात्र तरीही अनेक जण रस्त्यानं प्रवास करत असल्यानं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्यानं संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येत असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. परिस्थिती सध्या धोकादायक वळणावर असून सर्वांनी घरीच राहावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला केलं.
Coronavirus: आणखी ८ रुग्ण आढळले; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९७ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 8:20 PM