लोहारा (उस्मानाबाद) : गुप्तधनासाठी एका पडक्या वाड्यात खोदकाम करणाऱ्या आठ जणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना लोहारा तालुक्यातील वडगाव येथे घडली. या वेळी भोंदूबाबासह तिघे पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यातील वडगाव (गां.) येथे एक भोंदूबाबा व इतर आठ जण दोन गाड्यांमधून गुप्तधनासाठी आले होते. पडक्या वाड्यात आघोरी पूजा केल्यानंतर, रात्री दहा वाजल्यापासून खोदकाम सुरू केले. रात्री बारा वाजता गावातील ४० ते ५० तरुणांनी त्या ठिकाणी जाऊन ‘इथे काय करता’, अशी विचारणा केली व त्यांना पकडले. या प्रकरणी लोहारा सपोनि शाहुराज भिमाळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात महम्मद बाबू सय्यद, काशीनाथ दणाने, दिगंबर पन्हाळकर, प्रशांत भोसले, दशरथ महादेव अव्हाड, हणमंत प्रेमनाथ थोरात, रवी गोकुळ चव्हाण, भीमाशंकर काशाप्पा गुत्तेदार, गोकुळनाथ गोसावी, संतोष पाटील, सुनील काकडे या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्तधनासाठी खोदकाम करणारे आठ जण अटकेत
By admin | Published: February 08, 2016 4:27 AM