नवी मुंबई : इयत्ता बारावी परीक्षेतील मराठी व एस.पी. विषयाचा पेपर फोडल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी विरारमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. त्याने २० हजार रुपयांसाठी दोन खासगी क्लासचालकांकरिता हे पेपर फोडले होते. पोलिसांनी दोन खासगी क्लासचालकांनाही अटक केली आहे.बारावीचा मराठी व एस.पी. (सेक्रेटरीअल प्रॅक्टिस) या दोन विषयांचे पेपर परीक्षेपूर्वी १० ते १५ मिनिटांपूर्वी फुटल्याची तक्रार बोर्डातर्फे वाशी पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील मोबाइल जप्त करून पोलिसांनी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. त्यामधून या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.विरार येथील माऊंट मेरी शाळेचा मुख्याध्यापक आनंद कामत (४३) याने हे पेपर परीक्षेपूर्वी लीक केल्याचे तपासात उघड झाल्याचे सहआयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. यात या शाळेचा क्लार्क गणेश राणे (३०) हाही सहभागी होता. याकरिता त्यांना अॅड. निखिल राणे (२९) या खासगी क्लासचालकाने प्रत्येकी २० हजार रुपये दिले होते. या दोघांनी प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून निखिलला पाठवले होते. त्यानंतर निखिल व अन्य एक खासगी क्लासचालक विनेश धोत्रे या दोघांनी त्यांच्या क्लासच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ते शेअर केले होते. याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांचा ग्रुप तयार केला होता; परंतु त्यांच्या ग्रुपमधील काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका इतरही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केल्यामुळे पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकासह आठ जण जेरबंद
By admin | Published: March 12, 2017 12:17 AM