मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील ११ ते १९ वयोगटातील मुलींना एक रुपयात आठ सॅनिटरी नॅपकिन देण्यात येतील, तसेच महिला बचत गटातील लाखो महिलांना पूर्वीपेक्षा कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
भाजपच्या नमिता मुंदडा यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर वर्षा गायकवाड, भारती लव्हेकर, हसन मुश्रीफ, सुलभा खोडके, राजेश टोपे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना ११ ते १९ वयोगटातील मुली तसेच बचत गटात कार्यरत असलेल्या २९ लाख महिलांसाठी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन देणारी ‘अस्मिता’ योजना आणली होती. डिसेंबर २०२२ पासून ती का बंद करण्यात आली आणि आता योजना कधी सुरू करणार, असा प्रश्न मुंदडा यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार असताना स्वस्त धान्य दुकानातून सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते, याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
१०० कोटी रुपयांची तरतूद
- महाजन यांनी सांगितले की, बचत गटांमधील महिलांना पूर्वी आठ सॅनिटरी नॅपकिन २४ रुपयांना दिले जात होते. हा दर कमी केला जाईल. बाजारामध्ये त्याची किमान किंमत ३८ रुपये आहे. येत्या दीड महिन्यात ही योजना पुन्हा सुरू केली जाईल. या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- रेशन दुकानांमधून त्यांचे वितरण करायचे काय याबाबतही विचार केला जाईल. महिला आमदारांच्या काही सूचना असतील तर त्यांचा अंतर्भाव केला जाईल व त्यासाठी त्यांची बैठक लवकरच घेतली जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.