लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सलग पाचव्या दिवशी ८,२९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ६२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,५५,०७० झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार १५४ झाला आहे. राज्यात सध्या ७७ हजार ८ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ३,७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण २०,२४,७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४२ टक्के इतका आहे. नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधीत घटलामुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ५१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर मुंबईतील दुपटीचा दर २४५ दिवसांवर पोहोचला आहे. तर दिवसभरात मुंबईतील ८१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोना होऊनही बाहेर फिरणाऱ्यावर गुन्हा मुंबई : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह असतानाही होम क्वारंटाइन राहण्याऐवजी बाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा रुग्ण चेंबूरच्या सायन-पनवेल मार्गालगत असणाऱ्या सोसायटीत राहत होता.