सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा धंदा सुरू होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिस व वैद्यकीय समितीच्या संयुक्त पथकाने सोमवारी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकून, गर्भपात तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स व आणखी कागदपत्रे जप्त केली. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा आरोग्य विभागाने चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. डॉ. खिद्रापुरे अद्याप फरारी असून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केल्यानेच खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आले. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरल्याचे स्पष्ट झाले. रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने त्या ठिकाणी खुदाई केली, त्यावेळी १९ भ्रूण सापडले होते. सोमवारी दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने रुग्णालयावर छापा टाकला व तेथील कागदपत्रे व औषधांची तपासणी करण्यात आली. यामध्ये खिद्रापुरे २००९ पासून गर्भपाताचा धंदा करीत होता, असे पुरावे मिळाले आहेत. (प्रतिनिधी)>रात्रीस खेळ चाले...डॉ. खिद्रापुरे याच्या दवाखान्यात सुसज्य शस्त्रक्रियागृह सापडले असून रात्रीच्या वेळी तेथे गर्भपाताचा धंदा चालायचा. दिवसा तातडीच्या गर्भपातासाठी तळघरात आणखी एक शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले होते. तळघरात शस्त्रक्रियागृहात एक हौद आहे. या हौदात अॅसिड टाकून भ्रूण नष्ट करण्यात येत असल्याचा संशय आहे. दवाखान्यात गर्भपाताची उपकरणे व औषधे मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रूपये दर होता.
आठ वर्षे गर्भपाताचा धंदा
By admin | Published: March 07, 2017 4:31 AM