ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - जुलै २०१५ पर्यंत हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपणाचा पर्याय दिला असता तर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नसता. कारण, तब्बल ४२ वर्षे उलटूनही राज्यात एकही हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली नव्हती. पण, आॅगस्ट २०१५ मध्ये मुंबईतले पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले. आणि अवघ्या ११ महिन्यांत हृदय प्रत्यारोपणामुळे २० जणांना जीवनदान मिळाले आहे. मंगळवार, २१ जून रोजी हृदय घेऊन औरंगाबाद ते मुंबई हे २९९ किमीचे अंतर अवघ्या १ तास २० मिनिटांत कापले. ३८ वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. औरंगाबाद येथील ३२ वर्षीय पुरुषाच्या कुटुंबियाने हृदयदान केल्यामुळे ३८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वायरल मायोकार्डिटीस आणि इंट्राक्टटेबल आर्थे्रमिया या आजाराने ग्रस्त होता. कोणत्याही प्रकारची औषधांचा आणि उपचारांचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. हृदय प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय होता. औरंगाबादमधील पुरुषाने हृदयदान केल्यामुळे ३८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. ज्या कुटुंबियांनी हृदयदान करण्यात पुढाकार घेतला हे सर्व श्रेय त्यांचे आहे. कारण, त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीचे मेंदू मृत झाल्यावर हृदयदान केल्यामुळे आम्ही यशस्वीपणे २० जणांना हृदयप्रत्यारोपण करुन जीवनदान देऊ शकलो आहोत. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला वॉर्डमध्ये हलवण्यात येईल, असे हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. --------------------------------असा झाला हृदयाचा प्रवास सकाळी ६.३५ - औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा रुग्णालयातून हृदय घेऊन डॉक्टर निघालेसकाळी ६.४२ - हृदय औरंगाबाद विमानतळावर पोहचले. सकाळी ६.५२ - कमर्शिअल फ्लाईटने हृदय घेऊन डॉक्टर मुंबईच्या दिशेने निघालेसकाळी ७.२७ - हृदय घेऊन डॉक्टर मुंबई विमानतळावर पोहचले सकाळी ७.३५ - हृदय घेऊन रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयाच्या दिशेने निघालीसकाळी ७.५४ - हृदय फोर्टिस रुग्णालयात पोहचले सकाळी ७.५५ - हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. ------------------------------रस्त्यावर असा केला होता ग्रीन कोरिडोर -मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक आठपासून ते फोर्टिस रुग्णालयात या मार्गावर ग्रीन कोरिडोअर करण्यात आला होता. -सांताक्रूझ विमान तळ गेट क्रमांक ८ -मिलिटरी रोड- सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड-छेडा नगर ते इस्टर्न एक्सप्रेस हायवे-ऐरोली जंक्शन-फोर्टिस रुग्णालय, मुलुंड