ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 21 : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी अत्यंत इर्षेने सुमारे ८० टक्क्यापर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर हुल्लडबाजी व त्यावरून पोलिसांनी लाठीमार केल्याच्या दोन घटना घडल्या तरी इतरत्र मात्र शांततेत ही प्रक्रिया पार पडली.
दोन्ही काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्र रिंगणात आहेत. मावळत्या सभागृहात काँग्रेसच्या हातात सत्ता होती यावेळेलाही दोन्ही काँग्रेसचीच हवा असल्याचे चित्र गावागावांत दिसले. जिल्ह्यात २४५१ मतदान केंद्रे असून ६१८१ मतदान यंत्रे देण्यात आली होती. निवडणुकीसाठी १६,१७६ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यांत ११ लाख १२ हजार इतके पुरुष आणि महिलांचे १० लाख २५ हजार इतके मतदान आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच ६० टक्के मतदान झाले होते. मतमोजणी गुरुवारी असून दुपारी दोन वाजेपर्यंत सत्ता कुणाची याचा फैसला होणार आहे. या निवडणूकीत भाजपने आव्हान उभे केल्याने निवडणूकीत कमालीची चुरस दिसून आली. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसारखे एकेक मतदान उमेदवारांनी मतदानासाठी बाहेर काढले. मतदारांना बाहेर आणण्यासाठी सर्वत्र वाहनांचा वापर झाला. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग जास्त होता.
उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे दुपारी हा वेग मंदावला. चारनंतर पुन्हा राहिलेले मतदान करून घेण्यासाठी यंत्रणा सक्रीय झाली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महे (ता.करवीर) व कुशिरे(ता.पन्हाळा) येथे हुल्लडबाजीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्याचे पडसाद म्हणून कुशिरेत जमावाने पोलिसांवर हल्ला केला. अन्यत्र मात्र ही प्रक्रिया शांततेत पार पडली.