लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुनावणीला सुरुवात झाली ते थेट लंचटाइम वगळता न्यायालयीन कामकाजाचा वेळ संपेपर्यंत सुरू होती. मात्र, यादरम्यान जामीन अर्जावर सुनावणी घेणाऱ्या न्या. पृथ्वीराज चव्हाण यांचे एकलपीठ व अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांच्यात कबीरांचे दोहे व शेरोशायरीची देवाण-घेवाण झाली.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी पुढील सुनावणी १ किंवा २ ऑगस्ट रोजी ठेवण्याचा आग्रह एकलपीठाकडे केला. तर ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअधिकर्ता अनिल सिंग यांनी पुढील आठवड्यात वैयक्तिक अडचणीमुळे आपल्याला युक्तिवाद करणे जमणार नाही, असे न्यायालयाला सांगितले. मात्र, चौधरी पुढील आठवड्यातच सुनावणी घेण्याचा आग्रह धरत होते. तर सिंगही आपल्याला पुढील आठवड्यात जमणार नाही, यावर ठाम होते. अशा स्थितीत न्या. चव्हाण यांनी अखेरचा मुघल बादशाह बहादूरशाह जफरचा शेर म्हणण्यास सुरुवात केली. ‘उम्र-ए-दराज माँग के लाई थी चार दिन, दो आरजू में कट गए दो इंतिजार में... कितना है बदनसीब ‘जफर’ दफ्न के लिए, दो गज जमीन भी न मिली कूचा-ए-यार में...’
‘मला या ओळी आठवतात कारण या ओळींवरून मानवी आयुष्य किती अनिश्चित आहे, ते ही या कोरोनाकाळात, हे समजते,’ असे न्या. चव्हाण म्हणाले. देशमुख यांच्या वयाचा, आजाराचा हवाला देऊन तसेच सिंग यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्यास जमत नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद करण्याची विनंती करूनही चौधरी यांना सुनावणीसाठी पुढील आठवड्याची तारीख मिळेना तेव्हा चौधरी यांनीही प्रसिद्ध गझलकार जगजीतसिंह यांच्या गझलेचा आधार घेत आपली व्यथा न्यायालयात मांडली. ‘एक महिने के वादे पर साल गुजारा, फिर भी ना आए वादे का ये एक महिना, कब तक आखिर, आखिर कब तक झूठी-सच्ची आस पे जीना...’
दरम्यान, सुनावणीवेळी चौधरी यांनी अनिल देशमुख यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार‘ब्लॅक आऊट’ची समस्या उद्भवत असल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘ब्लॅक आऊट’मुळे १४ जुलै रोजी ते बेशुद्ध पडल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्या. चव्हाण यांनी देशमुख यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले का? अशी विचारणा चौधरी यांच्याकडे केली. एक आरोपपत्र व एक पुरवणी आरोपपत्र ईडीने दाखल केले आहे. मात्र, तपास सुरू असल्याचे तपास यंत्रणा म्हणत आहे. त्यांचे हे विधान सर्वच प्रकरणांसाठी असते. त्यांचा तपास कधीच संपत नाही, असे चौधरी यांनी म्हटले.
अँकलेटमध्ये बसवा चिप चौधरी यांनी न्यायालयाला एक सूचना केली. ‘जसे परदेशात आरोपींकडून जामिनाची मोठी रक्कम घेऊन त्यांच्या अँकलेटमध्ये चिप बसविण्यात येते आणि जीपीएस सिस्टिमद्वारे त्यांच्या हालचालींवर व ठावठिकाण्यांवर लक्ष ठेवण्यात येते. अशीच सुविधा आपल्या देशातही सुरू करायला हरकत नाही,’ असे चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले.
सुनावणीदरम्यान, न्या. चव्हाण यांनी कबीरांचा एक दोहा म्हटला. ‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय... जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय...’ या दोह्याचे शेवटचे दोन शब्द न्या. चव्हाण यांच्याबरोबर चौधरी यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.