शिवसेनेचा १९ जूनला वर्धापन दिन आहे. यामुळे त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी स्वत: मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत.
काल शिंदे-फडणवीस दिल्लीला गेले होते. वेगळी काही कामे होती. त्यावेळी ही देखील चर्चा झाल्याची चर्चा सुरु आहे. दोघांचीही आमच्याशी भेट झालेली नाही. नारायण राणेंसोबत शिंदेंची बैठक होणार आहे. यावेळी आम्ही शिंदे यांना भेटणार आहोत. तेव्हा आम्हाला समजेल. विस्तार झाला तर १९ तारखेच्या आत होईल. कदाचित पुढील आठवड्यात होऊ शकतो अशी चर्चा आहे. शिंदेंना विचारल्याशिवाय खात्री देऊ शकत नाही. परंतू तयारी जवळजवळ होत आलीय असे आम्हाला वाटतेय, असे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
आम्ही पहिल्या रांगेत होतो. मला मंत्रीपद मिळेल यात दुमत नाहीय. थोडे थांबल्यामुळे आम्ही संयम बाळगून होतो. आता संधी मिळू शकते. येणाऱ्या काळात महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका जिल्हा परिषदा अशा निवडणुका आहेत. त्यादृष्टीने ठोस काहीतरी ठरण्याची शक्यता आहे, असे गोगावले म्हणाले.
कोणाची वर्णी लागणार?विधानसभा निवडणुकीला आता दीड वर्ष राहिले आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून आला आहे. न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. आता तो निर्णय कधी येतो याचीच शिवसेनेचे दोन गट वाट पाहत आहेत. मात्र, ११ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीय. यामुळे शिंदे गटात नाराजी आहे, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या गटात शिंदे गटाच्या कोणा कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.