बीड : मानवी हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष तथा दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबाद येथे उपचारादम्यान निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहतीत मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी गयाबाई, मुलगा मिलिंद, मुली रेखा व शालन तसेच जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बीडसह मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे.काही दिवसांपूर्वी पोटाचा आजार जडल्याने आवाड यांना हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अल्सर (पोटाचा आजार)ची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे मातंग समाजातील गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण कले. समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी १९९०मध्ये मानवी हक्क अभियानची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी ५० हजारांहून अधिक दलित बांधवांना हक्काचे गायरान मिळवून दिले़ जातीव्यवस्थेवर घाव घालून अस्पृश्यता, नामांतर चळवळ, सावकारकी, एक गाव एक पाणवठा असे असंख्य लढे त्यांनी दिले. अत्याचारग्रस्त कुटुुंबांना अॅट्रॉसिटी अॅक्टची माहिती देऊन जनजागृतीचे काम त्यांनी केले. संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय इतर आंतरराष्ट्रीय परिषदांनाही त्यांनी हजेरी लावली होती. ‘जग बदल घालुनी घाव’ या आत्मचरित्रासह परिवर्तनवादी विचारांचे त्यांनी लिखाण केले. विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांची तेलगावकडे धावएकनाथ आवाड यांचे निधन झाल्याची बातमी कळताच राज्यभरातील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अनेक कार्यकर्त्यांनी तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहतीत सोमवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या चाहत्यांचे लोंढे तेलगावात रात्री उशिरापर्यंत दाखल होत होते.दलित चळवळीतील दुवा निखळला!प्रताप नलावडे ल्ल बीडदलितांमधील जातीपातीची दरी दूर करण्यासाठी हयातभर कार्यरत राहणाऱ्या अॅड. एकनाथ आवाड यांच्या निधनाने दलित चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दलित चळवळ म्हणजे दलितांमध्ये असलेली दरी दूर करणे आणि आंबेडकरी विचारांचा स्वीकार करत बुद्धाच्या मार्गावर चालत राहण्याचा विचार त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या अकाली जाण्याने दलित चळवळीतील महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. सहकारापासून ते अगदी राजकारणापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात लिलया कार्यरत होणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणूनच आवाड संपूर्ण राज्याला परिचित होते. प्रस्थापितांविरोधातील लढाई त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. त्यासाठी दबाव गट तयार करून प्रसंगी विद्रोहही केला. यासाठी त्यांनी सामाजिक संस्थेचा उपयोग तर केलाच; परंतु राजकारणातही आपला दबाव असला पाहिजे, या विचारातून त्यांनी बहुजन मजूर पक्षाचीही स्थापना केली होती. प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कायद्याचा उपयोग शस्त्र म्हणून आवाड यांनी केला आणि दलितांना मानवी हक्क मिळवून देताना स्वकीयांकडूनच झालेले तलवारीचे वारही त्यांनी झेलले. संघटनात्मक काम करताना त्यांची शैली नेहमीच आक्रमक राहिली. दलित पँथरच्या शैलीशी त्यांची कार्यपद्धती जुळत होती. गुन्हेगारीचा कलंक असणाऱ्या पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. समाजकारणातील सगळे प्रयोग आवाड यांनी केले. त्यांनी बांधावर उभे राहून शेती केली आणि पत नसलेल्या लोकांसाठी सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट नावाची पतसंस्था सुरू केली. सध्या १० कोटींची उलाढाल असलेल्या आणि मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत शाखा असणाऱ्या या संस्थेत तळागाळातील लोकांना अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध करून आवाड यांनी अनेक हातांना रोेजगार देण्याचे काम केले. मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातच नव्हे, तर देशपातळीवरही काम उभे केले. दलितांवर अन्याय, अत्याचार झाला आणि त्या ठिकाणी आवाड पोहोचले नाहीत, असे कधी घडले नाही. समाजाताील अंधश्रद्धा आणि दलितांमध्ये असलेल्या अनिष्ठ प्रथा-परंपरांचे निर्मूलन झाले पाहिजे, यासाठी त्यांनी लढा उभा केला. स्वत:चे वडील पोतराजासारख्या जोखडात अडकल्याचे पाहून तरुणपणीच आवाड यांनी स्वत: हातात कात्री घेऊन वडिलांच्या डोक्यावरील जटा कापून आपल्या विद्रोहाची सुरुवात केली. एकनाथ आवाड यांनी आपले संपूर्ण जीवनच दीनदलितांसाठी अर्पण केले होते. एका बाजूला विद्रोह होता, आक्रोश होता तर दुसऱ्या बाजूला रचनात्मक कार्याचा ओढा होता. मळलेल्या पायवाटेवरून जाण्याचा मार्ग त्यांनी धुडकावला. घर सोडलं, गाव सोडलं आणि स्वत: जगण्याच्या लढाईत आपली वाट शोधली. अस्पृशता आणि बेठबिगारीचा लढा दिला, त्यासाठी राज्यातील गावोगावी लढाही उभा केला.
एकनाथ आवाड यांचे निधन
By admin | Published: May 26, 2015 1:54 AM